टेंभुर्णी येथील काव्य पुष्पांजली मंडळ आणि काव्य मंथन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, यांच्या संयुक्त विद्यमाने माय-बाप साहित्य पुरस्कार वितरण समारंभ, श्री विठ्ठलराव शिंदे महाविद्यालयात संपन्न झाला. सुप्रसिद्ध साहित्यिक राजेंद्र दास यांच्या शुभहस्ते संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी प्रसिद्ध कवी इंद्रजित घुले, हरिश्चंद्र पाटील , विनोद तांबे, भास्कर सोनवणे, दत्तात्रय भुजबळ, रमेश वडवेराव , आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करुन, कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावर्षी शिवाजी सातपुते, सचिन पाटील, साईनाथ पाचारणे, संजय गोराडे, महेश जवंजाळ, विजय वडवेराव, अंकुश गाजरे, राजेश पवार , आदी साहित्यिक 'माय-बाप साहित्य' पुरस्काराचे मानकरी ठरले. त्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला.
"प्रत्येक साहित्यिकाने स्वतःची क्षमता ओळखावी आणि नक्कल न करता स्वतःच्या प्रतिभेचा आविष्कार आपल्या साहित्यात करावा. ते साहित्य रसिकांना भुरळ घालण्यात यशस्वी होईल," असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध साहित्यिक राजेंद्र दास यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केले. यावेळी झालेल्या कवी संमेलनात विविध भागातून आलेल्या कवींनी, आपल्या बहारदार रचना सादर केल्या, तर विनोद तांबे, भास्कर बंगाळे आणि गणपत जाधव, यांनी पुरस्कार प्राप्त पुस्तकांवर भाष्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश वडवेराव यांनी केले. तर शेवटी हरिश्चंद्र पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काव्य मंथन व काव्य पुष्पांजलीचे सर्व सदस्य आणि हितचिंतकांनी परिश्रम घेतले
