“सोलापूर जिल्हा परिषदेचे अभियंता श्री विजय भूमकर यांना आदर्श अभियंता पुरस्कार...!”
सोलापूर (बातमीदार) : “ग्रामीण भागातील सामान्य लोकांच्या जीवनासाठी आवश्यक असलेल्या रोटी, कपडा व मकानसाठी झेडपी अभियंत्यांचे योगदान महत्वाचे आहे.” असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी व्यक्त केले. ते अभियंता दिनाचे औचित्य साधून सोलापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम, जलसंधारण आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अभियंता पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. फडकुले सभागृहात सोमवारी आयोजित कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, संतोष कुलकर्णी, संजय धनशेट्टी, संजय पारसे, उपअभियंता सुनील कटकधोंड, श्रीमती बिटला, अभियंता संघटनेचे अतुल सरडे, पंडित भोसले आदी उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर विश्वेश्वरय्या मोक्षगुंडम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांनी स्वागत केले. “पूर्ण जबाबदारीने व अत्यंत बिनचूकपणे काम करणे हीच अभियंत्याची खरी ओळख आहे.” असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रास्ताविकात कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे यांनी कार्यक्रम आयोजनामागचा हेतू सांगितला. कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनी यंदा अभियंत्याबरोबरच त्यांना कामात मदत करणाऱ्या टेंडर क्लार्क व साहाय्यकांचाही समावेश करण्यात आल्याचे स्पष्ट केले. कार्यकारी अभियंता संजय पारसे यांनी जलसंधारणचे अभियंते ग्रामीण भागात तसेच दुर्गम ठिकाणी जाऊन काम करतात. कशाची तमा न बाळगता शेतीसाठी त्यांनी दिलेले योगदान महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. निवृत्त कार्यकारी अभियंता पंडित भोसले यांनी बोलताना “सोलापूर जिल्ह्यात १९७५ च्या दुष्काळात तयार झालेले तलाव आहेत. आता बांधावर गवत व झाडी वाढलेली आहे. अशा ठिकाणी झेडपीचे अभियंता सेवा देतात. त्यांचे काम खूप मोठे आहे. या अभियंत्याशिवाय शासनाच्या योजना यशस्वी होऊ शकत नाहीत. त्यामुळे सीईओ कुलदीप जंगम यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून राज्यस्तरीय अभियंता पुरस्कार सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत.” अशी अपेक्षा व्यक्त केली.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर म्हणाले की “अभियंते म्हणजे जिल्हा परिषदेच्या विकासाची चाके आहेत. ग्रामीण भागाच्या विकासात अभियंते मोलाची कामगिरी बजावतात. गेल्या वर्षभरात बांधकाम, जलसंधारण व जलजीवनमध्ये अभियंत्यांनी केलेली कामगिरी अतुलनीय आहे.” सर्वांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा आवर्जून उल्लेख सीईओ जंगम आपल्या भाषणात म्हणाले “जीवनासाठी काय लागते, रोटी, कपडा, मकान हे महत्त्वाचे अंग आहे. शेतीला लागणारे पाणी, घर उभारण्यासाठी लागणारी यंत्रणा आणि कपड्याची मशिनरी या सगळ्यांच्या निर्मितीमध्ये अभियंताचे योगदान आहे. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी धरण व इतर अनेक प्रकल्पामध्ये महत्त्वाचे योगदान दिले. त्यांचा आदर्श घेऊन झेडपीच्या अभियंत्यांनीही काम करणे आवश्यक आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करणे हे अभियंत्यांना चॅलेंज आहे. आपण एका समाजामध्ये सर्व लोकांसोबत काम करतो. सरपंच, ग्रामसेवक सदस्य व नागरिक या सर्वांना सोबत घेऊन काम करावे.” याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातीलश्री विजय भूमकर यांना आदर्श अभियंता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांतर्फे विजय भूमकर यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले. आभार कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अविनाश गोडसे, झहीर शेख, संजय कांबळे, चेतन वाघमारे, वीरुपक्ष जेऊरे, म्हमाने, वेदपाठक, शशिकला म्हेत्रे, जोत्स्ना साठे, चेतन भोसले यांनी परिश्रम घेतले.
