उपक्रमशील प्राथमिक शिक्षक सुनील जगताप आदर्श पुरस्काराने सन्मानित...
पंढरपूर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील जि. प. प्रा. शाळा पंचगंगा लवटेवस्ती, कौठाळी येथील प्राथमिक शिक्षक सुनील दत्तात्रय जगताप यांना पंढरपूर पंचायत समिती, शिक्षण विभागाच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.
शाळेतील वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता विकसित करणे, पालक सहभागातून शाळेच्या भौतिक सुधारणा घडवून आणणे, तंत्रस्नेही शिक्षक म्हणून वाखरी केंद्रातील सर्व शिक्षकांना साहाय्य करणे, पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वेगवेगळ्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये कार्यरत असणे तसेच विद्यार्थीप्रिय व उपक्रमशील शिक्षक म्हणून सुपरिचीत असणारे सुनील जगताप यांना त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल पंढरपूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. पंढरपूर - मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांच्या शुभहस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे, केंद्रप्रमुख लक्ष्मण कांबळे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन नागटिळक, उपाध्यक्ष भारत लवटे, सहकारी शिक्षक राजेश भोईटे आदी मान्यवर उपस्थित होते.
आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विविध सामाजिक संस्था व संघटनेमध्ये सक्रियपणे काम करणाऱ्या जगताप सरांचे सामाजिक, शैक्षणिक तसेच इतर ऐविविध स्तरांतून अभिनंदन होत आहे. परिवर्तन प्रतिष्ठान, गिरिजात्मक ग्रुप व राणा प्रताप ग्रुपच्यावतीने जगताप यांचे अभिनंदन करण्यात आले.

