विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचा साक्षात्कार : सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्युत अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांची विश्वेश्वरय्या संग्रहालयास अभ्यासपूर्ण भेट...
पंढरपूर (प्रतिनिधी) :- कोर्टी (ता. पंढरपूर) येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूरच्या विद्युत् अभियांत्रिकी विभागातर्फे दिनांक २३ जानेवारी ते २६ जानेवारी २०२६ या कालावधीत द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक शैक्षणिक दौऱ्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या दौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांनी कर्नाटक राज्यातील बेंगळुरू व म्हैसूर येथील विविध औद्योगिक, शैक्षणिक तसेच ऐतिहासिक स्थळांना भेट देत प्रत्यक्ष अध्ययनाचा मौल्यवान अनुभव घेतला.
या शैक्षणिक दौऱ्याच्या प्रमुख टप्प्यात दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी विद्यार्थ्यांनी बेंगळुरू येथील जागतिक कीर्तीचे विश्वेश्वरय्या इंडस्ट्रियल अँड टेक्नॉलॉजिकल म्युझियम येथे अभ्यासपूर्ण भेट दिली. या भेटीत विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, अभियांत्रिकी क्षेत्रातील मूलभूत व प्रगत संकल्पना, औद्योगिक प्रक्रिया तसेच नावीन्यपूर्ण तांत्रिक नवकल्पनांची सखोल माहिती मिळाल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी सांगितले.
संग्रहालयातील विविध प्रतिकृती, संवादात्मक (हँड-ऑन) प्रात्यक्षिके आणि माहितीपूर्ण प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांना वर्गात शिकविलेल्या सैद्धांतिक ज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग समजून घेण्याची संधी मिळाली. अभियांत्रिकी यंत्रणा, अंतराळ विज्ञान, विद्युत प्रणाली, स्मार्ट सेन्सरचा वापर, वीज निर्मिती प्रक्रिया, आधुनिक विद्युत वाहने, सौर ऊर्जा तंत्रज्ञान तसेच इलेक्ट्रॉनिक्स व इंटरॲक्टिव्ह सायन्स गॅलरींचा विद्यार्थ्यांनी सखोल अभ्यास केला.
या शैक्षणिक भेटीमुळे सिद्धांत व प्रत्यक्ष उपयोग यांमधील दरी कमी होऊन विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक दृष्टिकोन अधिक प्रगल्भ झाला आहे. तंत्रज्ञान व औद्योगिक क्षेत्रातील भविष्यातील करिअरविषयी विद्यार्थ्यांची आवड आणि आत्मविश्वास वाढल्याचे त्यांच्या प्रतिक्रियांतून स्पष्ट झाले.
या औद्योगिक शैक्षणिक सहलीत विद्युत् अभियांत्रिकी विभागातील द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. सदर सहलीचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे व उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. विद्युत् विभागप्रमुख डॉ. के. शिवशंकर, आय.व्ही. समन्वयक प्रा. अमोल गोडसे तसेच प्रा. विनोदकुमार मोरे, प्रा. दत्तात्रय कोरके, प्रा. सोनाली घोडके यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट नियोजन व समन्वय साधत सहलीच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे योगदान दिले.