“व्हाट्सअप आणि फेसबुकच्या दुनियेमध्ये मराठी साहित्य निर्मिती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.” :- प्रा.डाॅ. लक्ष्मणराव ढोबळे

“व्हाट्सअप आणि फेसबुकच्या दुनियेमध्ये मराठी साहित्य निर्मिती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.” 
:- प्रा.डाॅ. लक्ष्मणराव ढोबळे

पंढरपूर (प्रतिनिधी) :- “व्हाट्सअप आणि फेसबुकच्या दुनियेमध्ये मराठी साहित्य निर्मिती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तोला मोलाच्या या दुनियेमध्ये माणसं विखरली जात आहेत. समानतेच्या या स्त्री-पुरुष वर्गामध्ये अजूनही स्त्रियांवरती अन्याय अत्याचार केला जातो ही दुर्दैवाची बाब आहे. म्हणून मंगळवेढे सारख्या संत भूमिमधील शब्दकळा साहित्य संघाचे अध्यक्ष प्रा. शशिकांत जाधव गेली पंचवीस वर्षे यांनी साहित्याची चळवळ निर्माण करून ती महाराष्ट्रात अजरामर केली आहे.” असे महत्त्वाचे उद्गार सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर लक्ष्मण ढोबळे यांनी काढले. ते मंगळवेढा येथे रविवार दिनांक ११ जानेवारी रोजी शब्दकळा साहित्य संघाचा पंचवीसावा वर्धापन दिन मारुतीच्या पटांगणामध्ये साजरा करण्यात आला त्याप्रसंगी बोलत होते. यावेळी पंढरपूर मंगळवेढा चे विद्यमान आमदार समाधान दादा आवताडे, तसेच पुणे विभागाचे माजी विधान परिषद सदस्य दत्तात्रय सावंत सर यांच्या शुभहस्ते शब्दकळा साहित्य संघाचा पंचवीसावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
          कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. शशिकांत जाधव लिखित 'व्यथा स्त्री मनाच्या' या कथासंग्रहाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन व्यासपीठावरील प्रमुख मान्यवर यामध्ये मंगळवेढा प्रथम नागरिक नूतन नगराध्यक्ष सौ. सुनंदा आवताडे, इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज च्या उपप्राचार्य सौ. तेजस्विनी कदम, तसेच ॲड नंदकुमार पवार, जयसिंगपूरच्या लेखिका नीलम मानगावे, सांगलीच्या कवयित्री स्वाती शिंदे यांच्या शुभहस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
         “ मंगळवेढा सारख्या संतभूमीमध्ये साहित्याची धुरा सांभाळत असताना प्रा. शशिकांत जाधव हे कोणतेही राजकारण करत नाहीत. स्वतःच्या समाजकारणाबरोबरच माणसं सांभाळण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे व त्यांच्या लेखणीमध्ये आहे म्हणूनच आतापर्यंत त्यांनी अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत. याचा आनंद मंगळवेढेकरांना आहे. भविष्यामध्ये आणखी काही वाचनालय असतील किंवा साहित्याचे प्रयोजन असेल त्यावेळेला मी निश्चितच त्यांच्या पाठीमागे सर्वच दृष्ट्या उभा राहीन.” असे उदगार मंगळवेढा पंढरपूरचे आमदार समाधानदादा आवताडे यांनी काढले.
          “शिक्षणाबरोबरच ज्यांनी साहित्याची सेवा केली. हे शब्दकळाच्या साहित्याचे रोपटे लावून त्याचे वटवृक्षामध्ये रूपांतर करणारे प्रा. शशिकांत जाधव हे महाराष्ट्रातील नामांकित साहित्यिकांना इथे आणून येथील साहित्य वृक्षाला साहित्याचे पाणी घालून ते जास्तीत जास्त कसे मोठे होईल याचा विचार करतात.” असे गौरव उद्गगार पुणे विधान परिषदेचे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी काढले.
          या कार्यक्रमाचे उद्घाटन व दीप प्रज्वलन करून इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेजच्या उपप्राचार्या सौ. तेजस्विनी कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मंगळवेढा ही भूमी संतांची असून आता ती साहित्यिकांची झाली आहे याचा मला अभिमान वाटतो.” असे उद्गार काढले.
          पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर निमंत्रित कवयित्रींचे कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कवी संमेलनात स्वागताध्यक्ष म्हणून सांगलीच्या स्वाती शिंदे, बारामतीच्या डॉ. सुनंदा शेळके, जयसिंगपूरच्या नीलम माणगावे, सांगलीच्या वर्षा चौगुले, सांगोल्याच्या योजना मोहिते, मोहोळच्या डॉ. स्मिता पाटील व सासवडच्या स्वाती बंगाळे यांनी बहारदार कविता सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
          या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून संभाजीनगरचे टी. एस. चव्हाण, प्रा. दिलीप जाधव सांगली सोलापूरचे उद्योगपती मनोहर मुधोळकर, श्रीमंत लष्करे कोल्हापूरच, रमेश जेठे अहिल्यानगर, डॉ. बजरंग धोत्रे पंढरपूर, उद्योगपती वैभव नागणे मालक कल्पतरू परिवार आदी उपस्थित होते.
          शब्दकळा साहित्य संघातर्फे महाराष्ट्रातील नामांकित साहित्यिकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यामध्ये श्री. माधव पवार सोलापूर, डॉ. आप्पासाहेब पुजारी मंगळवेढा, मा. आशा नेगी पुणे, मा. दत्ता गोसावी बार्शी, मा. प्रकाश गव्हाणे बार्शी, पी. एस. बनसोडे लातूर, सुरेश दाजी पवार मरवडे, कल्पना नरांजे नागपूर, व मंगळवेढा दामाजी एक्सप्रेसचे सर्वेसर्वा दिगंबर भगरे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
          या कार्यक्रमात प्रा. शिवाजीराव काळुंगे, प्रा.शोभा काळुंगे, प्रा. येताळा भगत, माजी प्राचार्य श्रीधर भोसले, डॉ. वामनराव जाधव, श्री राहुल शहा, जयदीप रत्नपारखी हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. भूषण पाटील यांनी केली. 
          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मिसाळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन हरिप्रसाद देवकर यांनी केले. या कार्यक्रमात प्रा. मनोज अवधूत, विरंगुळा ग्रुप, षण्मुखानंद दाते, डॉ.श्रेयश जाधव, दादा जाधव यशोदीप जाधव, आदी मान्यवरांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post