“ वयाच्या सर्व अवस्थांमध्ये पुस्तक हे उत्तम मार्गदर्शक. ” - कवी रवि वसंत सोनार

 “ वयाच्या सर्व अवस्थांमध्ये पुस्तक हे उत्तम मार्गदर्शक. ” - कवी रवि वसंत सोनार 



नगर वाचन मंदिर येथे पुस्तकभेट कार्यक्रम...



पंढरपूर (प्रतिनिधी /वार्ताहर /वृत्तसेवा) :- “ मानवी जीवनामध्ये वयाच्या बालपण, तरूणपण, प्रौढावस्था तसेच वृद्धावस्था या व इतर सर्व अवस्थांमध्ये वेगवेगळी पुस्तके ही उत्तम मार्गदर्शक म्हणून कार्यरत असतात.” असे मत येथील सामाजिक कार्यकर्ते व विश्वविक्रमवीर कवी रवि वसंत सोनार यांनी व्यक्त केले. ते त्यांच्या जन्मवर्षाच्या सुवर्णमहोत्सवाच्या औचित्याने संकल्पित कला, क्रीडा, साहित्य, संगीत, सांस्कृतिक, अध्यात्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांच्या संकल्पांतर्गत पुस्तक भेट पंधरवड्याच्या कार्यक्रमात बोलत होते. पुढे बोलताना कवी रवि सोनार म्हणाले की - “ मानवी जीवनात मार्गदर्शक असणाऱ्या दुर्मिळ तसेच नव्या जुन्या पुस्तकांचे जतन करणे आवश्यक आहे.”

          कवी रवि सोनार यांच्या वाढदिवसानिमित्त पुस्तक भेट पंधरवड्याच्या पहिल्या दिवशी सौ. सविता रवि सोनार व कवी रवि वसंत सोनार यांनी येथील नगर वाचन मंदिर या मुक्तद्वार वाचनालयासाठी स्नेहभेट स्वरुपात महाराष्ट्रातील विविध भागातील साहित्यिक, कवी आणि कवयित्री यांची वेगवेगळ्या प्रकाशनच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेली वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथपाल मा. प्रवीण पाठक यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी पत्रकार लखन साळुंखे व अनेक रसिक वाचक उपस्थित होते. 

          वाचाल तर वाचाल यास अनुसरून वाचन संस्कृती वाढीस लागावी म्हणून आणि रसिक वाचकांना बहुविध पुस्तके वाचावयास मिळण्यासाठी श्री. व सौ. सविता रवि सोनार यांच्या या उपक्रमाचे साहित्यिक व वाचकांकडून स्वागत व कौतुक होत आहे. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक कवी - कवयित्री, रसिक वाचक तसेच कवी रवि सोनार स्नेह परिवाराच्या वतीने विशेष परिश्रम घेण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post