विवेक वर्धिनी विद्यालय येथे पुस्तकभेट कार्यक्रम...
पंढरपूर (प्रतिनिधी /वार्ताहर /वृत्तसेवा) :- “ वेगवेगळ्या साहित्यिकांनी लिहिलेली वैचारिक पुस्तके वाचल्यावर वाचकांच्या मनामध्ये सकारात्मक विचार निर्माण होतात.” असे मत येथील सामाजिक कार्यकर्ते व विश्वविक्रमवीर कवी रवि वसंत सोनार यांनी व्यक्त केले. ते त्यांच्या जन्मवर्षाच्या सुवर्णमहोत्सवाच्या औचित्याने संकल्पित कला, क्रीडा, साहित्य, संगीत, सांस्कृतिक, अध्यात्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांच्या संकल्पांतर्गत पुस्तक भेट पंधरवड्याच्या कार्यक्रमात बोलत होते. पुढे बोलताना कवी रवि सोनार म्हणाले की - “ मनामध्ये निर्माण झालेली सकारात्मकता ही स्वतःबरोबर एकूणच मानवी जीवनासाठी अत्यंत उपयुक्त आहे.”
कवी रवि सोनार यांच्या वाढदिवसानिमित्त पुस्तक भेट पंधरवड्याच्या दुसऱ्या दिवशी श्री. व सौ. सविता रवि सोनार यांनी कवी रवि वसंत सोनार यांनी उच्च माध्यमिक शिक्षण घेतलेल्या विवेक वर्धिनी विद्यालय या शैक्षणिक संस्थेच्या ग्रंथालयासाठी स्नेहभेट स्वरुपात महाराष्ट्रातील विविध भागातील साहित्यिक, कवी आणि कवयित्री यांची वेगवेगळ्या प्रकाशनच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेली वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण पुस्तके ग्रंथपाल मा. धनंजय दिवाण यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी शिवाजी येडगे, इतर शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
वाचन संस्कृती वाढीस लागावी म्हणून आणि वाचाल तर वाचाल यास अनुसरून अनेक विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षक, शिक्षिका तसेच साहित्य रसिक कर्मचारी वृंद या वाचकांना बहुविध पुस्तके वाचावयास मिळण्यासाठी श्री. व सौ. सविता रवि सोनार यांच्या या उपक्रमाचे साहित्यिक व वाचकांकडून स्वागत व कौतुक होत आहे. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक कवी - कवयित्री, रसिक वाचक यांचे विशेष सहकार्य लाभले. तर कवी रवि सोनार स्नेह परिवाराच्या वतीने विशेष परिश्रम घेण्यात आले.
